Pune News : पुण्यातील 752 पैकी 518 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे ‘वर्चस्व’, जिल्हाध्यक्षांचा दावा

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज (सोमवार) जाहीर झाले आहेत. आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने भाजपचा धुव्वा उडवत बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील 752 ग्रामपंचायतीपैंकी 518 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.

यामध्ये बारामती तालुक्यातील 51 पैकी 50, इंदापूरमध्ये 60 पैकी 37, शिरुर 62 पैकी 45, आंबेगाव 29 पैकी 16, भोर 69 पैकी 35, वेल्हा 31 पैकी 16, खेड 90 पैकी 75, दौंड 51 पैकी 30, मावळ 57 पैकी 40, मुळशी 45 पैकी 37, जुन्नर 64 पैकी 40, खडकवासला 22 पैकी 17, पुरंदर 68 पैकी 35, हवेलीमध्ये 52 पैकी 45 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचेही उमेदवार काही ठिकाणी विजयी झाले आहेत. यामध्ये शिरुर, आंबेगांव, वेल्हा, खेड, मुळशी, खडकवासला तालुक्यांचा समावेश आहे.

प्रदीप गारटकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच विकासाची गंगा पुढे नेऊ शकते यावर मतदारांचा विश्वास आहे. हे त्यांनी या निकालातून दाखवून दिले. एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी केले आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी अधिक मजबूत झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विकासाच्या विचारांवरचा हा विश्वास असल्याचे गारटकर यांनी सांगितले.