… म्हणून तब्बल 52 हजार धारावीकर घरात ‘बंदिस्त’

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील विविध भागात कोरोना वेगाने पसरत असून पुणे, मुंबईत व्हायरसने थैमान घातले आहे.  विशेषतः धारावीमधील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस  भर पडून रुग्णसंख्या 117 वर पोहोचली आहे.  संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून धारावीतील 34 प्रतिबंधित विभागांमधील तब्बल 52 हजारांहून अधिक व्यक्तींना घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

धारावीमधील झोपडपट्टीत कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती बिकट झाली असून काल  दिवसभरात 16 जणांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. तर आतापर्यंत करोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या धारावीतील इमारती आणि परिसर असे मिळून 34 ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

प्रतिबंधित करण्यात आलेले डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टमेन्ट, मुस्लीम नगर, मुकुंद नगर, मदिना नगर, सोशल नगर, कल्याण वाडी आदी परिसरांतील तब्बल 52 हजार 800 नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यत आली आहे. तसेच  पालिकेने धारावीमधील घरोघरी नागरिकांची तपासणी करण्यासाठी खासगी डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांनी आतापर्यंत 40 हजार नागरिकांची तपासणी केली आहे. त्यामध्ये 223 नागरिकांच्या चाचण्या करण्याची शिफारस पथकांकडून करण्यात आली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आतापर्यंत या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी 12 हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या 18 हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. तर गरजवंतांना दोन लाख 86 हजार रुपयांच्या औषधांचाही पुरवठा करण्यात आला आहे. धारावीमध्ये खासगी आणि पालिकेचे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य स्वयंसेविका, कीटकनाशक विभागातील कर्मचारी, अभियंते, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी आदी दोन हजार 484 जणांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.  कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणार्‍या अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे दाखल व्यक्तींची वैद्यकीय काळजी घेण्यासाठी 20 वैद्यकीय अधिकारी, 50 परिचारिका आणि 50 शिपाई व वॉर्डबॉयची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे.