म्युकरमायकोसिसचं राज्यात थैमान ! 52 जणांचा मृत्यू   

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना  आता म्युकरमायकोसिस या दुर्मिळ बुरशीजन्य आजाराने राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीनीं डोळे गमावल्याचे समोर आले आहे. या आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने निर्माण झालेल्या राज्यातील परिस्थितीचा घेतलेला आढावा.

प. महाराष्ट्र व कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये  म्युकरमायकोसिसचे एकही रुग्ण आढळला नाही. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान पुण्यातील  विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये या आजाराचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नाकात इजा झालेले तीन, डोळ्याला आजार झालेले दोन रुग्ण उपचार घेत आहेत. डॉक्टरांकडे उपचार घेणारे ४० रुग्ण आहेत.

मुंबईतील केईएम, नायर, सायन या पालिका रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांचे निदान वाढले आहे. अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी २ ते ३ रुग्ण आढळल्याचे सांगितले असून १२ जणांचा एक डोळा काढण्यात आल्याचेही  समोर आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात शेकडो जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शासकीय रुग्णालयात एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात १३ रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. विविधप्रकारच्या शस्त्रक्रिया  ५० पेक्षा अधिक रुग्णांवर करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आजरात एक नवे लेखन आढळले आहे ते म्हणजे टाळूला छिद्रे पडणे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये १८ रुग्ण आढळले.

विदर्भात दररोज नवे रुग्ण

नागपूरमध्ये म्युकरमायकोसिसचे दररोज नवे रुग्ण आढळत आहे. आठवड्याला २० ते २५ रुग्णाची नोंद होत आहे. गत तीन महिन्यात खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून ३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली. तर चार महिन्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ४९ रुग्णांची नोंद झाली. अमरावतीत आठ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या पाच रुग्ण दाखल झाल्याचे  डॉ. श्रीकांत महल्ले यांनी सांगितले. तर यवतमाळ जिल्ह्यात  सात रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या.

मराठवाड्यात १३ जणांना अंधत्व

मराठवाड्यातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत   अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या माहितीनुसार, औरंगाबादेत म्युकरमायकोसिसमुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जणांचे डोळे काढले, तर ९६ जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे ४५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  नांदेड जिल्ह्यात १२० हून अधिक रूग्ण तर बीडमधील माजलगावात १५ दिवसांत म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण आढळले आहेत.