नीरव मोदीच्या 112 वस्तूंचा ‘लिलाव’, 12 कोटींना विकली गेली एमएफ हुसेनची ‘पेंटिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) घोटाळ्यातील सुमारे १४,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी पीएनबी याच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या ११२ वस्तूंचा लिलाव होवून ५३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली. सर्वाधिक बोली अमृता शेरगिलच्या चित्रासाठी १४ कोटी तर १२ कोटी रुपये एमएफ हुसेन यांच्या चित्रासाठी होती. हुसेन यांच्या पेंटिंगसाठी आतापर्यंत इतकी बोली केव्हाच लागली नव्हती .

४० वस्तूंचा लिलाव हा थेट करण्यात आला. त्याचबरोबर ८२ वस्तूंचा ऑनलाइन लिलाव ३-४ मार्च पर्यंत चालला. या लिलावामधून जवळजवळ ५३,४५,०२,८२० रुपये मिळाले. तर अंदाज फक्त ४० करोड रुपयांचा होता. थेट लिलावामध्ये १३ पेंटिंग, २ मूर्ती, १३ लेडीज बॅग, एक बॅग, एक रॉल्स रॉयस कार समाविष्ट होती. यामध्ये भारतासोबतच अमेरिका आणि दुबई मधील लोकानींही भाग घेतला. गुरुवारी लिलाव केलेल्या ४० वस्तूंपासून ५१,४०,७०,००० रुपये मिळाले. ऑनलाईन लिलाव पासून २,०४,३२,८२० रुपये मिळाले.

१९३५ मध्ये अमृता शेरगिल यांनी बनविलेल्या ऑईल पेंटिंग ‘बॉय विथ लेमन्स’ला सर्वाधिक १४ कोटींची बोली लावली. एमएफ हुसेन यांच्या ‘बॅटल ऑफ गंगा जमुना’ आणि महाभारत चित्राला १२-१२ कोटींची बोली लागली. अशा प्रकारे ही पेंटिंग हुसेन यांची सर्वात महागडी कलाकृती बनली. या लिलावात सर्वात कमी २.२० लाखांची बोली हर्म्सच्या बॅगसाठी होती. २०१० मॉडेलची रोल्स रॉइस कार १.५० कोटींमध्ये विकली गेली.