धक्कादायक ! 24 तास ‘सतर्क’ राहून तुमच्यापर्यंत बातम्या पोहचवणार्‍या मुंबईतील 53 पत्रकारांना ‘कोरोना’ची लागण

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा वेग वाढत असून सर्वसामान्य नागरिक ते बॉलीवूड अभिनेत्यांपर्यंत अनेकांना बाधा झाली आहे. आता मुंबईमध्ये 53 पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील आठवड्यात पत्रकार संघाने मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या कोरोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये 168 जणांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 53 जणांना संसर्ग झाला आहे. बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील आहेत.

आरोग्य विभागाचे आधिकारी अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 168 पत्रकांराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी 53 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये अनेक जणांना कोणतीही लक्षणेही नव्हती. अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा अवहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, तसेच हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करावा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.