अल्पवयीन चोरट्यांकडून तब्बल ५६ सायकली जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – निगडी पोलिसांनी सात अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून महागड्या ५६ सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या सायकलींची किंमत सात लाख नऊ हजार ५०० रुपये इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीची माहिती पोलीस नाईक रमेश मावसकर यांना मिळाली. त्यानुसार गुरुवार (दि.२६) रात्री दहाच्या सुमारास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस उपयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप लोंढे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक गुन्हे शाखेचे राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली, किशोर पेंढरे, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, राहूल मिसाळ, विजय बोडके, सोमनाथ दिवटे, विलास केकाण, नितेश यादव, गणेश शिंदे, सतीश ढोले यांच्या पथकाने सापळा रचला.

संशयित सातजणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी परिसरातील महागड्या सायकली मौजमजा करण्यासाठी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी या सात जणांकडून चोरीच्या ५६ सायकली हस्तगत केल्या आहेत.

पोलिसांनी हस्तगत केलेल्या अनेक सायकलचे मालक मिळाले नाहीत. त्यामुळे साईकल चोरीला गेलेल्या नागरीकांनी ओळख पटवून त्या घेऊन जावेत, असे आवाहन पोलिसांतर्फ करण्यात आले आहे.