56 वर्षानंतर सरकारला मिळाले 56 KG सोने, माजी PM शास्त्री यांचे वजन करण्यासाठी केले होते गोळा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गोळा केलेले 56 किलो सोने आता तब्बल 56 वर्षानंतर सरकारला मिळणार आहे. सध्याच्या दराप्रमाणे बाजारात त्याची किंमत सुमारे 28 कोटी आहे. राजस्थानच्या चित्तौडगड जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने हे केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) च्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या हे सोने उदयपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवलेले आहे.

पाच वेळा आला कोर्टाचा निर्णय
या प्रकरणी आतापर्यंत कोर्टाने पाच वेळा निर्णय दिला आहे. पाचही वेळा सोनं सरकारकडे सोपविण्याचा निर्णय आला आहे. सर्वप्रथम, डिसेंबर 1965 मध्ये छोटी सादड़ीच्या गुणवंतने गणपत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता की माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गोळा केलेले सोने परत केले जात नाहीये.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे वजन करण्यासाठी गणपतने सोने गोळा केले होते. पण त्याआधीच ताशकंद येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, 11 जानेवारी 1975 रोजी कोर्टाने गणपतला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आणि सोने गोल्ड होल्डरकडे देण्याचे आदेश दिले. यानंतर, 14 सप्टेंबर 2007 रोजी उच्च न्यायालयाने गणपतला निर्दोष सोडले. पण सोने परत करण्याची अपील फेटाळण्यात आली. 2012 मध्ये गणपत यांचा मुलगा गोवर्धन यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती की, हे सोनं त्याच्या वडिलांचे आहे आणि पोलिसांनी ते वडिलांकडून परत मिळवले आहे. परंतु सत्र न्यायालयाने गोवर्धन यांची याचिका फेटाळून लावत बुधवारी सोने केंद्रीय वस्तू व सेवा कर जवळ ठेवण्यास सांगितले.