देहरादून : 57 प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद ; ऑनलाईन असेल प्रशिक्षण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आता ही आग देहरादूनच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन पर्यंत पोहोचली आहे. अकादमीतील 57 प्रशिक्षणार्थी अधिकारी कोविड -19 चे बळी पडले आहेत. मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्यामुळे 3 डिसेंबरपर्यंत संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी अ‍ॅकॅडमी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 57 प्रशिक्षु अधिकारी कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने ही संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली असून या कालावधीत प्रशिक्षणासह सर्व कामे ऑनलाईन घेण्यात येतील. ते म्हणाले की, शुक्रवारपासून 57 अधिकारी प्रशिक्षणार्थींना कोरोना विषाणूची लागण झालेली आढळली आहे आणि त्या सर्वांना स्वतंत्रपणे तयार केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून अकादमीमध्ये 162 आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सामाजिक अंतर ठेवणे, सतत हात धुणे आणि मास्क घालण्याशी संबंधित प्रोटोकॉलचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी वर्ग यांच्याकडून काटेकोरपणे पालन केले जात आहे.

देहरादूनमध्ये संक्रमितांची संख्या 20 हजारांच्या पुढे

कोविड – 19 इंडिया नुसार, उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूची एकूण 70,7 90 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी 1146 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देहरादूनमध्ये आतापर्यंत एकूण 1.9 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. इथल्या संसर्गाची संख्या 19920 आहे. तर कोविड -19 मुळे देहरादून जिल्ह्यात 635 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्याचबरोबर भारतात कोरोना रूग्णांची संख्या जवळपास 91 लाखांच्या आसपास आहे. देशात कोरोनामुळे 1 लाख 33 हजार 282 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या भारतात सक्रिय प्रकरणांची संख्या 4 लाख 40 हजार 708 आहे आणि 85 लाख 21 हजार 465 लोक बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत.

राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोना कहरात राज्य आणि केंद्र सरकारनेही कठोर पावले उचलली आहे. एकीकडे दिल्ली सरकारने मास्क न घातल्यास दंडाची रक्कम 2 हजार रुपये केली आहे. दुसरीकडे नुकताच गृहमंत्री अमित शहा यांनीही संसर्ग रोखण्यासाठी बैठक घेतली. कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र हे सर्वात जास्त बाधित राज्य आहे. येथे 17 लाख 74 हजार 455 लोक या विषाणूच्या कचाट्यात सापडले आहेत. त्याचबरोबर 46 हजार 573 लोक मरण पावले आहेत.