ग्राहकांचा वीज कंपन्यांना तब्बल 5776 कोटींचा ‘शॉक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टाळेबंदी काळातील वाढीव वीजबिलांचा भार कमी करण्यासाठी दिवाळीपूर्वी सवलत देण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. पण, काही दिवसांपूर्वी नागरिकांना वीज वापरली असेल तर बिल भरावेच लागेल, वीजबिलात कोणत्याही प्रकारची माफी किंवा सवलत नाही, अशी भूमिका राऊत यांनी मांडल्याने ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तसेच विरोधी पक्षाने आणि संघटनांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात टाळेबंदी काळात आलेल्या ५९ टक्के ग्राहकांनी वीजबिलांचा नियमित भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडे एकूण थकबाकी ५ हजार ७७६ कोटी रुपये असून, त्यातील काही कोटींची थकबाकी टाळेबंदीच्या काळातील आहे. वीजबिले थकवण्यात मुंबईकर ग्राहकांची संख्या २५ टक्के असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा टक्का ६४ पेक्षा अधिक आहे. मुंबईतील अदानी, टाटा, बेस्ट या तीन कंपन्यांपैकी नियमित भरणा करण्यात बेस्टचे ग्राहक अग्रेसर आहेत.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, वीजबिलांचा भरणा न होण्यामागे आर्थिक संकट प्रमुख कारण असले तरी राज्य सरकारकडून सवलत मिळेल, या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा केला नाही. म्हणूनच थकबाकीदारांचा टक्का मुंबईपेक्षा अडीच पट असल्याचे ते म्हणाले. तथापि, राज्यातील एकूण वीजग्राहक २ कोटी ४२ हजार असून त्यातील १ कोटी ४४ लाख ग्राहकांनी बिले भरली नाहीत.

उद्योग, व्यवसायांची थकबाकी वाढली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका उद्योगांनाही बसला असून, लघू आणि उच्चदाब विजेचा वापर करणाऱ्या उद्योगांची थकबाकी १७६२ कोटी आणि व्यावसायिक आस्थापनांची थकबाकी १४१४ पर्यंत वाढली. यात ३१७६ कोटींपैकी १६४० कोटी म्हणजेच निम्म्याहून जास्त थकबाकी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीतील आहे.