सेल्फी काढणे आजोबांना पडले महागात, 400 फूट दरीत पडले

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – सेल्फी काढण्याचे वेड फक्त तरुणांनाच नाही तर आजी-आजोबांना देखील सेल्फीचे वेड लागले आहे. आजी-आजोबांनी सेल्फी काढण्यात तरुण-तरुणींना देखील मागे टाकले आहे. मात्र, या सेल्फीच्या वेडापायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी काहींना कायस्वरुपी गंभीर दुखापत झाली आहे. असाच एक प्रकार माथेरान येथे घडला आहे. माथेरान येथे फिरायला आलेले एक आजोबा आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना 400 फूट खोल दरीत कोसळले.

सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा पाय घसरल्याने 400 फूट खोल दरीत कोसळलेले आजोबांचे दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले. दरीत पडल्यानंतर त्यांना स्थानिक बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अजित प्रभाकर बर्वे (वय-58) असे त्यांचे नाव आहे. ते मुंबईतील विलेपर्ले परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी ते माथेरानला फिरण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सेल्फी पॉइंट वर फिरण्यासाठी गेले होते. सुरक्षा कठडा ओलांडून दरी पहात असताना ते मोबाईलमध्ये सेल्फी काढत असताना त्यांचा तोल गेल्याने ते दरीमध्ये कोसळले.

बर्वे हे 400 फूट खोल दरीमध्ये कोसळले. पण दैव बलवत्तर असल्याने ते डोंगर माथ्यावर अडकून पडले. त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित पर्यटकांनी याची माहिती पोलिसांना दिली. हा प्रकार समजताच पोलीस हवालदार सुनील पाटील, नारायण बार्शी, महेंद्र राठोड, प्रशांत गायकवाड, राहुल पाटील, राहुल मुंढे यांना घटनास्थळी धाव घेत त्यांना रेस्क्यू टीमच्या सहाय्याने बाहेर काढल्याची माहिती माथेरान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी दिली.

सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सुनील कोळी, सुनील ढोले, अमित कोळी, अक्षय परब, उमेश मोरे, संतोष केळगणे, अमोल सकपाळ यांच्या पथकाने बर्वे यांना सुखरूप बाहेर काढले. हे रेस्क्यू ऑपरेशन तब्बल दोन तास चालले. सह्याद्री रेस्क्यू टीमने त्यांची दरीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Visit : Policenama.com