5 व्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धेचे 21 डिसेंबर पासून

पुणे- पुनित बालन ग्रुप तर्फे पाचव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ ते २७ डिसेंबर २०२० या कालावधीत मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर होणार आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे सर्वेसर्वा पुनित बालन यांनी सांगितले की, केवळ महिला खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ६ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. गेले चार वर्ष महिलांसाठीची ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आणि या वर्षी स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पुनित बालन ग्रुपने स्पर्धेला प्रायोजक्त्व दिले आहे. या स्पर्धेव्दारे ग्रामीण भागातील मुलींना एक संधी मिळत असून आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले.

सात दिवस चालणार्‍या या स्पर्धेच्या संघांची आणि खेळाडूंची निवड लिलावाने करण्यात आली. हा लिलाव रोख रक्कमेचा नव्हता तर, गुण पध्दतीचा होता. ९० खेळाडूंची गुण-पध्दतीने सहा संघांमध्ये विभागणी करण्यात आली. महाराष्ट्राची खेळाडू शिवाली शिंदे हिला (४७००० गुणांनी) ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले आहे. श्रध्दा पोखरकर हिला ३५५०० गुणांनी निंबाळकर रॉयल्स् संघाने तर, कोल्हापुरच्या ऋतुजा देशमुख हिला ३०००० गुणांनी लिजेंडस् पँथर्स संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे.

महाराष्ट्र २३ वर्षाखालील कर्णधार व आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेली खेळाडू तेजल हसबनीस ही निंबाळकर रॉयल्स् संघाची कर्णधार आहे. पुनम खेमनार (एचपी सुपरनोव्हाज्), किरण नवगिरे (लिजेंडस् पँथर्स), उत्कर्षा पवार (कुंतीविमलजी स्टार्स), मुक्ता मगरे (ऑक्सिरीच स्मॅशर्स) आणि सायली लोणकर (सिम्हा वॉरीयर्स) हे आपापल्या संघांचे कर्णधारपद भुषविणार आहे. भारतीय ग्रीन संघाने प्रतिनिधीत्व केलेली महाराष्ट्राची शिवाली शिंदे, श्रध्दा पोखरकर, ऋतुजा देशमुख अशा अनेक महाराष्ट्रातील महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी, २१ डिसेंबर रोजी माणिकचंद ऑक्सिरिचच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल आणि महाराष्ट्राचा रणजीपटू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज् संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.