धक्कादायक ! पाचवीतील मुलांना तंबाखूचे व्यसन

पोलिसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्र नशाबंदी मंडळाने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. इयत्ता पाचवीतील काही मुलं तंबाखूचे सेवन करत असल्याचे यामध्ये आढळून आले आहे. यापूर्वी सातवी आणि त्यापूढील विद्यार्थी तंबाखूचे सेवन करत असल्याचे दिसून आले होते. मात्र, छोटे विद्यार्थी सुद्धा या व्यसनाला बळी पडत असल्याचे उघड झाल्याने याचे गंभीर परिणाम भविष्यात होऊ शकतात.

तंबाखू, सिगारेटच्या व्यसनामुळे भारतात तोंडाच्या कर्करोगाच्या रूग्णांची संख्या सतत वाढत असताना ही महाराष्ट्र नशाबंदी मंळाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाल्याने या समस्येचे गांभीर्य आणखी वाढले आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र नशाबंदी मंडळाने मुंबई आणि परिसरातील पाच हजार शालेय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात, ४३ टक्के मुले उच्च राहणीमान आहे हे दाखवण्यासाठी, ९.३ टक्के मुले आनंद मिळण्यासाठी आणि ७ टक्के मुले मित्रांच्या संगतीने तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याचे दिसून आले.

सुमारे दोन कोटी ५८ लाख ९९ हजार २७३ जणांची तपासणी केली असता या सर्वेक्षणात असे आढळले की, २८,०४,३८० लोक सिगारेटचे व्यसन करतात. २२,२७,००८ लोकांना बिडीचे व्यसन आहे. तर २ कोटी २७ लाख ६४ हजार ९६६ जणांना गुटखा, मावा आणि पानमसाल्याचे व्यसन आहे.काही वर्षांपूर्वी सातवी ते दहावीचे विद्यार्थी तंबाखूचे व्यसन करत असल्याचे दिसून येत होते.मात्र, आता पाचवीपासूनच मुले तंबाखू व्यसन करत असल्याचे दिसून आले आहे.

ही चिंतेची बाब असून याचे मुख्य कारण ई-सिगारेट हा नवीन प्रकार आहे. ई-सिगारेटच्या व्यसनाकडे सध्या शालेय विद्यार्थी आकर्षित होत आहेत. हे व्यसन करत असलेल्या मुलांना भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या व्यसनापासून मुलांना दूर करण्यायसाठी उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे, असे महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.