इंडोनेशियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, सेमारांगमध्ये 6.3 च्या तीव्रतेने हादरली जमीन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगातील वेगेवगळ्या भागात वारंवार भूकंपाचे झटके येत आहेत. सोमवारी रात्री ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, तर मंगळवारी सकाळी इंडोनेशियामधील जमीन भूकंपामुळे हादरली. एका वृत्तसंस्थेनुसार, इंडोनेशियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ मोजली गेली आहे. हे ६ पेक्षा जास्त तीव्र भूकंपात मोजले गेले आहे.

भूकंपाचे केंद्रस्थान इंडोनेशियाच्या सेमारांगच्या १४२ किमी उत्तरेस होते. भूकंपामुळे होणारे नुकसान अद्याप समजू शकलेले नाही, पण वारंवार येणाऱ्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे लोक घाबरले आहेत. तर यावेळी भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

यापूर्वी ९ जून रोजी इंडोनेशियाच्या मलुकु प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी मोजली गेली होती. भूकंपाचे केंद्रस्थान बुरू जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिमेस १२६ किमी आणि समुद्रसपाटीपासून १० किमी खाली होते. मात्र भूकंपामुळे त्सुनामी आली नसल्याची दिलासादायक बातमी मिळाली.

तसेच ४ जून रोजी उत्तर मलुकु प्रांतात ६.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे १०० हून अधिक घरांचे नुकसान झाले होते. अनेक इमारतींना भेगा पडल्या. इंडोनेशिया द पॅसिफिक रिंग ऑफ फायर नावाच्या संवेदनशील भूकंपग्रस्त भागावर वसलेला आहे, ज्यामुळे येथे वारंवार भूकंपाचे धक्के येत असतात.