समुद्रात पाठलाग करून १४ संशयित बांग्लादेशी घुसखोरांना अटक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तटरक्षक दलाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीत  पाणजू बेटाजवळ संशयास्पद रित्या जाणाऱ्या बोटींचा पाठलाग करून त्यांचा ताबा मिळवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. परंतु एकूण सहा बोटींपैकी दोनच बोटींना रोखण्यात तटरक्षक दलाच्या जवानाना यश आले असून अन्य चार बोटीना निघून जाण्यात यश आले आहे.

तटरक्षक दलाच्या वतीने समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी ‘सजग’ मोहीम राबवली जात आहे. ३१ डिसेंबरच्या निमित्त समुद्रावर कडक निगराणी ठेवण्याचा सुरक्षा व्यवस्थेचा  मानस आहे.  शनिवारी वसईच्या  पाणजू बेटाजवळ ६ बोटी हालचाली करत असल्याचे तटरक्षक दलाच्या दृष्टीस आल्या. सकाळी ११. ३० च्या सुमारास या बोटा  पाणजू बेटाजवळ रेती भरत असल्याचे तटरक्षक दलाच्या जवानाना दिसून आले. तेव्हा या जवानांनी या बोटींचा पाठलाग करण्याचे ठरवले. बोटी तटरक्षक दलाच्या जवानानां बघून माघारी फिरल्या त्यानंतर या जवानांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला असता यातील दोन बोटींना वेढा टाकून अटक करण्यास जवानांना यश आले आहे. या दोन बोटींवर एकत्रित चौदा संशयितांना ताब्यात घेतले गेले आहे.

पसार झालेल्या चार बोटी तिवरा जंगला जवळ सोडून त्यातील लोक जंगलात पसार झाले. सहा बोटी पैकी दोन बोटीमध्ये सापडलेले संशयित बांग्लादेशी असून त्यांच्या जवळ कसली हि ओळखपत्र नाहीत. त्याच प्रमाणे या लोकांच्या जवळ कसलीच बोटीची नोंद असणारी कागदपत्र नाहीत. त्याच प्रमाणे या लोकांना हिंदी अथवा मराठी भाषा बोलता येत नाही.  त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या चौदा बांग्लादेशी लोकांना तटरक्षक दलाच्या सैनिकांनी वसई पोलिसांच्या ताब्यात दिले असून वसई पोलीस अधिक तपास करत आहेत.

शैफुल (27), एन मुल्ला (45), रफीगुल (19), शहीफुल (27), जे मुल्ला (40), मोंडल (28), पायनल (38), इब्राहिम शेख (25) ,आबिल शेख (25), शफीकुल (27),आहाजित (33), मोईद्दीन (45), इस्लाम (35), बी.शेख (22) अशी अटक करण्यात आलेल्या चौदा जणांची नावे आहेत.  कमांडर विजय कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हि कार्यवाही करून या चौदा लोकांना ताब्यात घेतले आहे.