जादा नफ्याच्या बहाण्याने मोटवानी कुटुंबियांना 6 कोटींचा गंडा; भाटिया, बासू अन् अधिराज सिंगविरूध्द 420 ची FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिघांनी एका कुटूंबाला तब्बल ६ कोटी ९ लाखांचा गंडा घातला आहे.

अनुराग गौतम भाटिया, सरबाशिस बासू आणि अधिराज अमित सिंग (सर्व रा. कर्नाटक ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश मोटवानी (वय ५०, रा. वानवडी ) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश कुटूंबियासह वानवडीत राहायला आहेत. त्यांची मिनान्स प्रा. लिमटेड कंपनीचे सीईओ अनुराग गौतम यांच्याशी २०१७ मध्ये एका हॉटेलमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर भाटिया यांनी राजेशचा विश्वास संपादित केला. त्यानुसार कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे आमिष कंपनीच्या तिन्ही संचालकांनी राजेश यांना दाखविले. त्यानुसार राजेश यांनी कुटूंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावाने तब्बल ६ कोटी ९ लाखांची गुंतवणूक केली. जुलै २०१९ मध्ये त्यांनी मिनान्स कंपनीत नफ्याची मागणी केली. त्यानंतर कंपनीने त्यांना नफ्यासह मुद्दल देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.