अहमदनगरमध्ये उष्माघाताने आठवड्याभरात ६ जणांचा बळी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात उष्माघाताने आठवडाभरात सहा जणांचा बळी घेतला आहे. तापमानाचा पारा ४५अंशावर पोहोचल्याने त्याचा त्रास जाणवू लागला आहे. मयत झालेल्यांत लष्करी जवानाचा समावेश आहे.

पारनेर तालुक्यात एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यापाठोपाठ श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील लष्करी जवान चंद्रकांत सूर्यभान राऊत (वय ३६) यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने, त्यांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात एक मुलगी, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. चंद्रकांत राऊत हे भारतीय सैन्य दलात होते. तांत्रिक कारणामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते पेडगाव येथेच वास्तव्यास होते. रोजगार मिळविण्यासाठी ते विजेच्या पोलची कामे घेत होते. सोमवारी दिवसभर उन्हात काम केल्यानंतर त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना श्रीगोंदा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील बाळासाहेब महादेव नवले (वय ४६) हे दिवसभर शेतात काम केल्यानंतर, काल सायंकाळी छावणीवर जात होते. त्यावेळी अचानक भोवळ येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

दुसर्‍या घटनेत राशीन येथील वेल्डिंग व्यवसाय करणारे गणेश पांडुरंग शिंदे (वय २६) यांचाही अचानक ताप वाढल्याने मृत्यू झाला. त्याच्यामागे आई, वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.या दोघांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे.