‘सोशल डिस्टन्सिंग’ 6 फूट पुरेसं नाही, तब्बल ‘एवढ्या’ फुटापर्यंत जाऊ शकतो ‘कोरोना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धूमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूशी जग दोन हात करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊन लागू केले आहे. मात्र आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली जात असली तरी अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूविरुद्ध संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय सध्यातरी आहे. मात्र, सध्या सोशल डिस्टन्सिंगसाठी जे अंतर निश्चित करण्यात आलं आहे ते पुरेसं नाही. त्या अंतराच्या तीनपट अंतरावर कोरोनाचा विषाणू पसरू शकतो, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. सध्या सर्वत्र दोन व्यक्तींमध्ये 6 फूटांचं अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र कोरोना व्हायरस तब्बल 18 फूट अंतरापर्यंत पसरु शकतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हलकी हवा वाहत असेल, तर सौम्य खोकल्यानंही व्हायरस असलेले ड्रॉपलेट्स 18 फुटापर्यंत हवेत राहू शकतात. साइप्रसच्या निकोसिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा हवेतील प्रसाराला समजून घेण्याची गरज आहे. फिजिक्स ऑफ फ्ल्युड जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे.

हेल्थलाइन नसुसार, संशोधकांनी एक कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आहे. ज्यामार्फत ते खोकल्याद्वारे निघणाऱ्या लाळेच्या कणांच्या हवेतील गतिविधींचा अभ्यास करत आहे. अभ्यासानुसार, पाच किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या हलक्या हवेत माणसाच्या लाळेचे कण पाच सेकंदात अठरा फुटापर्यंत जाऊ शकतात. संशोधनाचे अभ्यासक ड्रिमिट्रिस ड्रिकाकिस यांनी सांगितले हे ड्रॉपलेट्स क्लाउड वेगवेगळ्या उंचीचे वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं दोघांवरही प्रभाव टाकू शकतात. जर कमी उंचीच्या व्यक्ती या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात येतात तर त्यांना याचा जास्त धोका आहे.