कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या संशयामुळं चीननं 6 भारतीय विद्यार्थ्यांना रोखलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून चीनमध्ये अडकलेल्या ३२३ भारतीयांना रविवारी मायदेशी परत आणण्यात आले. त्याचबरोबर मालदीवच्या ७ जणांनाही भारतात आणण्यात आले. त्याचवेळी 6 भारतीय विद्यार्थ्यांना या विमानातून आणण्यास चीनमध्येच रोखण्यात आले. या ५ विद्यार्थ्यांना बऱ्यांच प्रमाणात ताप आला होता. त्यामुळे जर त्यांना कोरोना विषाणुची लागण झाली असल्यास त्याचा प्रसार अन्य ठिकाणी होऊ नये, यासाठी त्यांना भारतात पाठविण्यापासून रोखण्यात आले आहे.

भारताने एअर इंडियाद्वारे ३२४ भारतीयांना शनिवारी भारतात आणण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या विमानाद्वारे ३२३ भारतीयांना रविवारी नवी दिल्लीत आणण्यात आले असून त्या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणुमुळे आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाल्याचे चीनने जाहीर केले आहे. तसेच १४ हजार ३८० जणांना लागण झाली आहे. शनिवारी ४ हजार ५६२ जणांना लागण झाल्याचा संशय आहे. त्यातील ३१५ जणांची प्रकृती गंभीर आहे तर ८५ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे.