बिहारच्या कटिहार येथे ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जण ठार

कटिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या कटिहार येथे आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 31 (NH31) वर एक ट्रक आणि SUV कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. ही घटना कुर्सेला ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कुर्सेला ठाण्याच्या हद्दीत झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर यामध्ये तिघे जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर कुर्सेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जाते आहे. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की बिहारच्या कटिहार येथे झालेल्या रस्ते अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मी या सर्व लोकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. तसेच यामध्ये जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार पोलिसांनीही तपास सुरु केला आहे.