GJ : ट्रक- कारचा भीषण अपघात ! 7 जणांचा होरपळून मृत्यू

सुरेंद्रनगर : पोलीसनामा ऑनालाइन –   भरधाव ट्रक आणि कारच्या धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारला भीषण आग लागली आणि कारमधील प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील मालवण खेरवा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पाटण जिल्ह्यातील वरही तालुक्यातील कोयदा गावचे एक कुटुंब चोटीला मंदिरात गेले होते. मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. यात इको कारमधील सात लोकांचा जिवंत जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघातानंतर कारने इतक्या लवकर पेट घेतला की, त्यामधील पुरुष आणि महिलांची संख्या ओळखणेदेखील कठीण झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये गॅस किट होते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. एफएसएल टीम येऊन चौकशी करत आहे. मृत लोकांच्या निवासस्थानाची तपासणी वाहनच्या नंबर प्लेटच्या आधारे करण्यात येणार असल्याचे सुरेंद्रनगर जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक एचपी दोषी यांनी सांगितले.