खळबळजनक ! भाजपा नेत्याच्या परिवारातील 6 जणांची तलवारीनं वार करून हत्या, 2 लहान मुलांचा समावेश

मंडला/ मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यामध्ये एक खळबजनक घटना घडली आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबातील 6 जणांचा तलवारीने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी समोर येईल त्या व्यक्तीवर तलवारीने वार करून खून केला. या घटनेनंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी दोन मारेकऱ्यांना पडकडून बेदम चोप दिला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

मृतांमध्ये राजेंद्र सोनी (वय-58), त्याचा भाऊ विनोद सोनी (वय-45) त्याचा पुतण्या ओम सोनी (वय-9), भाची प्रियांशी सोनी (वय-7) मुलगी प्रिया सोनी (वय-28), त्यांची बहीण दिशेनी सोनी (वय-50) यांचा खून करण्यात आला आहे. संतोष सोनी (वय-35) या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. तर आणखी एक आरोपी हरी सोनी पोलीस कोठडीत आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, घटनेच्या वेळी चौकीवरील कर्मचारी कमी होते परंतु इतर पोलीस ठाण्यातून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. यानंतर तेथील एका आरोपीला पळून जात असताना त्याच्या पायावर गोळी मारण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मंडला जिल्ह्यातील बिजदांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनेरी चौकी येथे घडला आहे. सोनी कुटुंबातीलच दोन गटात मालमत्तेवरून वादा होते. यातूनच ही घटना घडली आहे.

एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला करत कुटुंबातील सहा सदस्यांचा खून केला. मयत राजेंद्र सोनी हा भाजपचा एक वरिष्ठ नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्याकांडात त्याच्याच कुटुंबातील सहा जण ठार झाले आहेत. हल्लेखोरांनी कुटुंबातील लहान मुलांना देखील सोडले नाही. हल्लेखोरांनी कुटुंबातील दोन लहान मुलांवर देखील तलवारीने वार करून त्यांचा खून केला. दोन आरोपींपैकी एकाची ग्रामस्थांनी मारून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जीत मालमत्तेवरून सोनी कुटुंबातील दोन भावांच्या कुटुंबात दीर्घकाळ वाद सुरू होता. या वादामुळेच एका भावाच्या कुटुंबातील दोन जणांनी घरातील इतर सदस्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. मयत राजेंद्र सोनी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याचे सांगण्यात येत असून ते व्यापारी होते. दुकानातच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर पाच सदस्यांचाही खून केला. यामध्ये 7 आणि 9 वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे. दुर्गम भाग असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.