60 वर्षीय रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे ‘कोव्हिड-मुक्त’

पुणे : पोलीसनामा  ऑनलाइन – शहरातील नामांकित व्यावसायिक कुटुंबातील ६० वर्ष वयाचे एक रुग्ण आयुर्वेदिक औषधांच्या आधारे कोव्हिड-१९ या आजारातून बरे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे त्यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र व्हेंटिलेटरवर न ठेवता आय़ुर्वेदिक पर्यायाची उपचारपद्धती देण्याची तयारी कुटुंबियांनी दाखविली व त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून आला आहे. पारंपरिक पद्धतीला आयुर्वेदाची जोड मिळाल्यामुळे कोव्हिडच्या या रुग्णाच्या परिस्थितीत सुधारणा होऊन त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारली व त्यांच्या श्वसनातील अडचणीही दूर झाल्या. त्यामुळे “आयुर्वेदाचा परिणाम उशिरा होतो आणि “क्रिटिकल” प्रकरणांमध्ये आयुर्वेदाची फारसा उपयोग नसतो” हा सर्वसामान्यांमध्ये असलेला गैरसमज आता दूर होण्यास मदत होईल.

कोव्हिड आजारातून बरे झालेले हे ६० वर्षीय तरुण २६ जणांच्या एकत्रित कुटुंबात राहतात. घसा खवखवणे आणि शिंकणे ही लक्षणे त्यांच्यात सर्वप्रथम आढळली. त्यापाठोपाठ त्यांना चढता ताप आणि कोरडा खोकला झाला. त्यावर त्यांच्या नेहमीच्या डाॅक्टरांनी काही अँटीबायोटिक्स दिले मात्र त्याचा फायदा झाला नाही. कोरोना संसर्गाचा संशय आल्यामुळे त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोव्हिड चाचणीमध्ये ते पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. पाचव्या दिवशी त्यांचा त्रास खूपच वाढला. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले होते. श्वास घेण्यातही अडचण येऊ लागली. ऑक्सिजन सॅच्युरेशन घटल्यामुळे डाॅक्टरांनी त्यांना मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र कुटुंबियांनी त्यास नकार दिला. त्यांच्या कौटुंबिक मित्राने रसायू आयुर्वेद क्लिनिकचे डाॅ. योगेश बेंडाळे यांचा सल्ला घेण्याचे त्यांना सुचविले.

डाॅ. बेंडाळे यांनी रुग्णाची संपूर्ण माहिती घेतली व त्यांचे वय आणि हायपरटेन्शन (बीपी) व अन्य धोके लक्षात घेऊन उपचार पद्धतीचे नियोजन केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचील इन्टेन्सिव्हिस्ट यांची संमती घेऊन त्यांच्या उपचारपद्धतीला पूरक अशी आयुर्वेदिक उपचार पद्धतीची जोड देण्यात आली.
उपचार सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाच्या स्थितीत सुधारणा झाली. त्यापुढील दोन दिवसात रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सामान्य झाले. रुग्ण धोक्यातून बाहेर आला. व्हेंन्टिलेटरवर जाण्यापासून रुग्णाला रोखण्याचे उद्दिष्ट आयुर्वेदिक उपचारांमुळे साध्य झाले.
डाॅ. योगेश बेंडाळे म्हणाले, “आयुर्वेदातील रसायन उपचार पद्धतीमुळे सामाजाला फायदा होईल. कोव्हिडचा प्रसार रोखण्यामध्ये या उपचार पद्धतीची निर्णायक भूमिका असेल. विशेषतः प्रतिकारशक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्याचा खूप फायदा होईल. या उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळालेली आहे.”

कोविडवरील संशोधनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील संशोधकांना आवाहन केले होते. देशातील काही निवडक आयुर्वेदाशी संबंधित वैद्य व कंपन्यांशी त्यांनी सवांद साधला. यातही डाॅ. योगेश बेंडाळे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून काय करता येईल यावर सकारात्मक चर्चा झाली. मा. पंतप्रधानांच्या आदेशानुसार कोविडवर संशोधन करण्याकरिता निर्माण केलेल्या पीएम टास्क फोर्स फाॅर कोव्हिड१९ च्या एका गटाचे सदस्यत्व मिळून देशाकारिता व आयुर्वेदाकरीता खारीचा वाटा उचलण्याची संधीही त्यांना मिळाली.

काॅन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे रुग्णाच्या कुटुंबातील २६ पैकी ११ जणांची कोव्हिड चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी ८ जणांमध्ये कोणतीच लक्षणे आढळली नाहीत तर अन्य व्यक्तींमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली.

ठळक मुद्दे
* कोविड रुग्णाला आयुर्वेदातील रसायन /व्यक्तिसापेक्ष चिकित्सेचा फायदा. यामुळे निश्चितच रुग्णांच्या मनातील भीती कमी होईल.
* आजाराची गंभीरता किती त्यानुसार मिळणारा उपशमही वेगवेगळा.
* गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना कोविडचा जास्त धोका परंतु प्रतिबंधात्मक म्हणून आयुर्वेद उपचार पद्धती उपयुक्त.
* जगात कोविड मुळे होण्याऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता आयुर्वेद एक आशेचा किरण.
* जनमानसात कोविड च्या काळात भारतीय शास्त्र म्हणून मोलाचे स्थान.
* अश्या काळात मानसिक आरोग्य /प्रतिकार शक्ती कामी येते हा आयुर्वेद सिद्धांत उपयोगी.
* आयुर्वेद वैद्यांनी एकत्र येऊन समाजहितासाठी काम करण्याची गरज.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like