कारची चावी न दिल्याने 60 वर्षीय महिलेचा खून

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी कार दिली नसल्याच्या रागातून एकट्या राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला होता.  मीरारोड येथे नोव्हेंबर रोजी घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.
मीरारोड मध्ये एकट्या राहणाऱ्या रीटा रॉड्रीग्ज या 60 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. संजय उर्फ सोनू वर्मा या आरोपीला अटक करण्यात आले आहे. चार महिन्यापूर्वी रीटा यांच्याकडे पत्नीला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी गाडीची मागणी केली होती. आणि ती देण्यास नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
संजय उर्फ सोनू वर्माला पोलिसांनी कानपूर मधून अटक केली आहे. संजय हा रेल्वेच्या गाड्यांचे दुरुस्तीच काम करणारा खाजगी कंत्राटदार आहे. मयत रिता या त्यांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच रहात होत्या. तसेच संजय उर्फ सोनू वर्मा हा देखील पूर्वी त्याच बिल्डींगमध्ये राहत होता. चार महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी त्याने रिटा यांच्याकडे गाडी मागितली होती. त्यावेळी रिटा यांनी त्याला गाडी देण्यास नकार दिला. त्याच कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता.
याचा राग मनात धरून 4 नोव्हेंबर रोजी संजयने दिवाळी सणानिमित्त पेढे देण्याचा बहाण्याने रिटा यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने चाकूने त्यांच्या गळा, हात, पाय आणि पोटावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने रिटा यांच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची चैन, कानातील सोन्याचे झुमके आणि पर्समध्ये असलेली रोख रक्कम चोरून तेथून मूळ गावी कानपूर, उत्तर प्रदेशला निघून गेला. त्याला पोलिसांनी कानपूरहून अटक केली आहे.
रिटा यांचे पती सुमारे सात वर्षा पूर्वी मरण पावले होते. त्या आपल्या घरी एकट्याच रहात होत्या. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाली होती.  येत्या 21 नोव्हेंबर रोजी वयाची साठी साजरी करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन ही केले होते. रविवार दुपारपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. सोमवारी रात्री त्यांच्या मैत्रिणीने इमारतीतील परिचित महिलेला रिटा यांची माहिती घेण्यास सांगितले. ती महिला रखवालदारासह घरी त्यांना पहायला गेली असता रिटा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यावर सीसीटीव्हीमध्ये संजय वर्मा हा संशयास्पद अवस्थेत रीटा यांच्या इमारतीबाहेर असल्याचे दिसून आले होते. त्याच आधारावर पोलिसांनी तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.