भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, नसीरुद्दीन शाह, कोंकणा, पालेकरांसह 600 कलाकार एकवटले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह या दाम्पत्यासह इतर अनेक कलाकारांनी भाजपा आणि मित्रपक्षांना मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. यात दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यांसारख्या कलाकरांचा समावेश आहे. देशभरातील जवळपास 600 नाट्य कलाकार भाजपा सरकारविरोधात एकवटल्याचे दिसत आहे.

या 600 कलाकारांनी एक पत्रक काढले आहे आणि त्यातून मतदारांना आवाहन केले आहे. कट्टरता, द्वेष आणि उदासिनतेला सत्तेपासून दूर ठेवा असं आवाहन या पत्रकात करण्यात आलं आहे. या पत्रकाखाली 616 कलाकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यात नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, डॉली ठाकोर, लिलिएट दुबे, अभिषेक मजुमदार, संजना कपूर यांसारख्या कलाकरांचा समावेश आहे.

‘धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि सर्वसमावेशक भारतासाठी मतदान करा, भाजपा आणि त्याच्या सहयोगींविरोधात मत द्या. कमजोरांना सशक्त करण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदान करा’ असं आवाहन मतदारांना या पत्राद्वारे करण्यात आले आहे. हे पत्रक विविध 12 भाषांमध्ये प्रसारीत करण्यात आले आहे.

या पत्रकात असंही म्हटलं आहे की, ‘स्वतंत्र भारताच्या इतिहासात या सर्वात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. विकासाचं आश्वासनं देत भाजपा सत्तेत आली. मात्र द्वेष आणि हिंसाचाराच्या राजकारणात त्यांनी “हिंदुत्व गुंडांना मुक्तसंचार” करु दिला. पाच वर्षांपूर्वी ज्याची राष्ट्राचा रक्षणकर्ता अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती, त्याने आपल्या धोरणांद्वारे लाखो नागरिकांची उपजीविका नष्ट केली’ असाही दावा या पत्रकात करण्यात आला आहे.