‘थर्टी फर्स्ट’ साठी पब, बार, हॉटेल्स ‘या’ वेळेपर्यंत राहतील सुरु 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी सरकारने पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल, बार ,परमिट रूम  आणि  इतर आस्थापना सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.  नवर्षांचा आनांद लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारी पोलीस यंत्रणा ३१ डिसेंबर ला अधिक क्षमतेने कामाला लागणार आहे. यावेळी शहरात जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. यासाठी ६००० पोलीस तैनात असणार आहे. तसेच मद्यपान करून गाडी चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज 
नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील तरुणाई सज्ज झाली आहे. काही पुणेकर हॉटेल्स,पब, बार,रेस्टॉरंट याठिकाकांनी नववर्षाच्या स्वागताची पार्टी करतात तर काहीजण घरीच नववर्षाचे स्वागत करणे पसंत करतात.  एक जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व दारूविक्री सुरू राहणार आहे. तर, स्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. पण, त्यासाठी त्यांना पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, सर्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खासगी पार्ट्यांनादेखील स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरात याठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था 
–शहरात डेक्कन, कोरेगाव पार्क, लष्कर, मुंढवा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
–सर्व पोलिस ठाण्यांना अतिसंवेदनशील, संवेदनशील या ठिकाणी बंदोबस्त लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पोलिस ठाण्यांकडील कुमक थर्टी फर्स्टच्या रात्री त्यांच्या हद्दीत रस्त्यावर असणार आहे.
— मुख्यालयाकडून साडेतीनशे पोलिसांची कुमक देण्यात आली आहे. शहरांच्या सर्व प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला शहरात २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
–नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, कोरेगाव पार्क, महात्मा गांधी रस्ता या भागात मोठी गर्दी असते. या ठिकाणी किरकोळ कारणावरून होणारी भांडणे टाळण्यासाठी आणि एकाच ठिकाणी गर्दी जास्त वेळ थांबू नये, म्हणून स्ट्रायकिंग फोर्स लावण्यात आल्या आहेत.
–गर्दीमध्ये साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरात नववर्षाच्या स्वागताला तरुणी व महिलादेखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये, म्हणून खास पाच छेडछाडविरोधी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या प्रमुख पाच महिला अधिकारी असून त्यांच्याकडे पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. महिलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पथके काम करणार आहेत.
वाहतूक यंत्रणा देखील सज्ज 
थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी असते. त्यामुळे मोठ्या चौकात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चौकाचौकात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या वेळी मद्यपान करून वाहने चालविणाऱ्याच्या विरोधात ३०० पेक्षा जास्त ब्रेथ अ‍ॅनलायझरच्या साह्याने वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत. नववर्षाच्या स्वागताला पार्टी केल्यानंतर मद्यापन करून वाहने चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाणार आहे. शहरात वाहतूक शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी मद्यपी चालकांवर कारवाई केली जात आहेत.