नगर-सोलापूर रोडवर १२ लाखांचा ६३ किलो गांजा जप्त

नगर : पोलीसनामा ऑनलाईन

नगर-सोलापूर रोडवर भिंगार कॅम्प पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संयुक्तीक कारवाई करुन १२ लाखांचा ६३ किलो ३६ ग्रॅम गांजा जप्त केला. या गुन्ह्यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही शनिवारी (दि.२६) करण्यात आली.

सुभान शेख (वय-२५, रा. रामजी नगर, केडगाव), अशीष आरुण आडेप (रा. चितळी रोड, नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गिरीधर यांनी फिर्य़ाद दिली आहे.

जामखेड रोडने अहमदनगरच्या दिशेने येणा-या इंडिका (एमएच१६ एजे १८९५) कारमधून लाखो रुपयांचा गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना समजली. मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचा-यांनी नगर सोलापूर रोडवर भिंगार नाला येथे नाकाबंदी केली. त्यावेळी जामखेड कडून अहमदनगर शहरात येणारी इंडिका कार आडवून कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कारमध्ये ६३ किलो ३६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी कार आणि गांजासह दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ७१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जी. गठ्ठे, सहाय्यक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस नाईक राजु सुद्रीक, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस शिपाई प्रदिप कारभारी बोरुडे, दत्तात्रय पोटे, महिला पोलीस शिपाई मोहीनी कर्डक, पोलीस शिपाई भाऊसाहेब काळे, पोलीस नाईक बनकर, गोसावी, करखीले यांच्या पथकाने केली.