Coronavirus : चिंताजनक : पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू, 24 तासात 44 नवे कोरोनाबाधित आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर कोरोनामुळं अनेकांचे बळी जात आहेत. पुण्यातील परिस्थिती देखील अतिशय चिंताजनक आहे. आज (बुधवार) दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला असून पुणे शहरात आज नव्याने तब्बल 44 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये भवानी पेठेत राहणार्‍या 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे तर दुसरा मृत्यू शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या 34 वर्षीय पुरूषाचा आहे. दरम्यान, गोखलेनगर परिसरात राहणार्‍या 63 वर्षीय पुरूषाचा काही वेळापुर्वी म्हणजेच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. आज मुंबईत तब्बल 66 नवे रूग्ण आढळून आले आहेत.