Coronavirus : राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णांचा नवा ‘उच्चांक’, 24 तासात 6330 नवे रुग्ण, बधितांचा आकडा 1.86 लाख वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत गेल्या 24 तासांत तब्बल 6330 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 86 हजार 626 इतकी झाली आहे. तर फक्त मुंबईत 80 हजार 699 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 4689 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यामध्ये 125 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून राज्यातील मृतांचा आकडा 8178 इतका झाला आहे. राज्यात 1 लाख 86 हजार 626 रुग्णांपैकी 77260 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली असून जुलैच्या सुरुवातीलाच एकाच दिवशी 8018 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 172 झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून या विभागातून 7033 रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज घरी सोडण्यात आलेल्या 8018 रुग्णामध्य मुंबई मंडळात 7033, पुणे मंडळात 477, नाशिक मंडळात 332, औरंगाबाद मंडळ 93, कोल्हापूर मंडळ 31, नागपूर मंडळ 33 घरी सोडण्यात आले आहे. 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तशाच प्रकारे विक्रमी रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 51 ते 53 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. राज्यात सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.