COVID-19 : चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 6364 नवे रूग्ण, 198 जणांचा बळी तर बाधितांचा आकडा 1.92 लाखावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना विषाणूने हाहाःकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या नवा विक्रम प्रस्थापित करत आहेत. या धक्क्यांनी राज्य हादरून गेले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 6364 रुग्ण आढळून आले आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 92 हजार 990 वर गेला आहे. तर आज 198 मृत्यूची नोंद झाली आहे. यामधील 150 मृत्यू हे मागील 48 तासांमधील असून 48 हे त्या आधिचे आहेत. त्यामुळे राज्यातील मृत्यूची एकूण संख्या ही 8376 वर गेली आहे.

मुंबईत आज 1338 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 82074 वर गेली आहे. तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 4762 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि परिसरातील उपनगरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली मध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 687 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 79 हजार 911 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. या रुग्णांवर राज्यातील विविध शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.