ओमानमार्गे भारतात आणलेले 8 कोटींचे 640 टन पाकिस्तानी सुके ‘खजूर’ जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर चुकवून ओमानमार्गे भारतात आणलेले पाकिस्तानी सुके खजूर महसूल गुप्तचर महासंचालनालयने (DRI) जप्त केले आहेत. डीआरआयने केलेल्या या कारवाईमध्ये साठे आठ कोटी रुपयांचे 640 टन सुके खजूर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 20 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डीआरआयचे सह आयुक्त समीर वानखेडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.

इम्रान तेली, इरफान नुरसुमार, मोहनदास कटारिया व सेवक मखिजा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणी आंतरराष्ट्रीय माफिया गुंतलेले आहेत का याची चौकशी केली जात आहे. पुलवामा हल्ल्यानंर भारत पाकिस्तान व्यापारी संबंधावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानमधून भारतात आयात करण्यात येणाऱ्या वस्तुंवर 200 टक्के कर आकरण्यात येत आहे.  कर चुकवण्यासाठी पाकिस्तानी सुके खजूर ओमान येथे पाठवून ते ओमानचे खजूर असल्याचे भासवून त्याची भारतात निर्यात करण्यात आली. परंतु डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गुप्त चौकशी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

डीआरआयने न्हावाशेवा येथे आणण्यात आलेले 40 टन वजनाच्या 16 कंटनेरमधील 640 टन खजूर जप्त केले आहेत. या खजूरावरील 200 टक्के प्रमाणे 8 कोटी 50 लाख रुपयांचा कर भारत सरकारला देणे गरजे होते. मात्र, हा कर चुकवण्यासाठी  हे खजूर ओमान मार्गे भारतात आणण्यात आले होते. मात्र, डीआरआयच्या नेटवर्क मुळे ते जप्त करण्यात आले. याचप्रकारे चैन्नई, गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या खजुराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील व्यापार मर्यादित झाल्यानंतर ही पहीलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे.