गरिबांच्या मदतीसाठी 65 हजार कोटी आवश्यक : रघुराम राजन

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशातील गरिबांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यासाठी आपत्तीच्या काळात 65 हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी गुरुवारी दूरचित्रसंवादाद्वारे राजन यांच्याशी देशाच्या आर्थिक परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. देशाची अर्थव्यवस्था 200 लाख कोटी रुपयांची असून गरिबांसाठी त्यातील 65 हजार कोटी रुपये ही फार मोठी रक्कम नाही. सरकारला गरिबांना वाचवायचे असेल तर एवढी रक्कम देण्यात कोणतीही अडचण येऊ नये, असे मत राजन यांनी व्यक्त केले.

कोरोनामुळे देशातील बहुसंख्य नागरिकांकडे रोजंदारी व उपजीविकेचे साधन राहिललेले नाही. त्यांच्या जगण्यासाठी अन्नधान्य आदींची तातडीने व्यवस्था करावी लागणार आहे. देशात अनेक ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्था पुरेशा प्रमाणात पोहोचलेली नाही. लोक या व्यवस्थेच्या बाहेर राहिलेले आहेत. त्यांनाही अन्नधान्य पुरवले पाहिजे. त्यासाठी तात्पुरत्या शिधापत्रिका देण्याचा पर्याय माझ्यासह अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी यांनी सुचवलेला आहे. करोना ही आपत्ती असून त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांकडे त्याच तीव्रतेने पाहावे लागेल, असेही राजन म्हणाले. देशात सलग 37 दिवस टाळेबंदी लागू असून आणखी तीन दिवसांनी (3 मे रोजी) दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. यासंदर्भात राजन म्हणाले की, टाळेबंदी आणखी वाढवणे आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. कोरोनाचे संपूर्ण निर्मूलन केल्यानंतर टाळेबंदी उठवण्याचा विचार करता येत नाही.