लोकसभेतून काँग्रेसचे 7 सदस्य निलंबीत, बजट सत्रात नाही होऊ शकणार सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत गदारोळ माजवल्याने लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित केले आहे. या खासदारांनी दिल्लीतील हिंसाचाराबाबत चर्चा करण्यासंदर्भात सभागृहात गदारोळ माजवला त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतापन, गुरजितसिंग यांच्यासह अनेक खासदार आहेत.

संसदेच्या दोन्ही सदनात २ मार्च (सोमवारी) दिल्ली हिंसाचारावर जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. लोकसभेत भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. काँग्रेसचे खासदार ‘गृहमंत्री, राजीनामा द्या’ असे फलक दाखवत होते. भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांच्यासह काही भाजप खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.

या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदेचे कामकाज देखील थांबवले होते. असे असताना देखील खासदारांमध्ये वाद सुरुच होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.