विटा तालुक्यातील खानापूरमध्ये ७ लाखांची घरफोडी

विटा : पोलीसनामा ऑनलाईन

विटा तालुक्यातील खानापूरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी ४३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि ३ किलो ६०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरुन नेले.

सागर दुर्योधन गायकवाड यांनी खानापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्य्या माहितीनुसार, सागर गायकवाड हे पुणे येथे नोकरीस आहेत. जुलै महिन्यात त्यांचे लग्न झाल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी संसार साहित्य घेऊन ते पत्नी, आई आणि बहिणींना घेऊन पुण्याला गेले होते. जाताना त्यांनी त्याच्याकडील सोने चांदीचे दागिने कपाटात ठेवले होते. चोरट्यानी घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने लांबवले.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44477938-9be9-11e8-95e4-75b1e6388999′]

सागर यांच्या आई जयश्री यांच्या मैत्रिणीने दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिल्यानंतर गायकवाड कुटुंबीय पुण्याहून खानापूर येथे आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर आणि  पोलीस निरीक्षक रविंद्र पिसाळ आणि पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक पाचारण करण्यात आले. दरम्यान, ते खानापूर ते भिवघाट रस्त्यावर काही अंतरावर जाऊन घुटमळले असे पोलिसांनी सांगितले आहे.