काय सांगता …! मंत्रालयात वेटरपदासाठी पदवीधरांची झुंबड,पात्रता केवळ ४ थी पास 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- इंजिनिअर असलेल्या तरुणांनी वडापाव किंवा चहाचे दुकान काढल्याच्या अनेक घटना तुम्ही पहिल्या आणि ऐकल्या असतील. देशात शिकलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे पण नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे.आता मुंबई येथील मंत्रालयातील कॅन्टीन वेटरच्या केवळ १३ जागांसाठी तब्बल ७ हजार अर्जदारांनी अर्ज केल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे या अर्जदारांमध्ये प्रामुख्याने पदवीधर तरुण तरुणींचा समावेश मोठ्या संख्येने असल्याची माहिती राज्याच्या सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

खरतंर वेटर या पदासाठी कमीत कमी ४थी शैक्षणिक पात्रतेची अट असून या पदाकरिता १०० गुणांची लेखीपरीक्षा घेण्यात आली आहे. १३ जणांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.  निवड झालेल्या १३ जणांपैकी ८ पुरुष तर इतर ५ महिला आहेत. तरी, वेटर पदी निवड झालेल्या १३ पैकी १२ जण हे पदवीधर आहेत तर एकजण १२ वी पास आहे. त्यामुळे आरक्षणासाठी जरी मोर्चे निघाले तरी, १३ पदांसाठी जेव्हा ७ हजार पदवीधर तरुणवर्ग अर्ज करतो, तेव्हा यातील खरी परिस्थिती किती भयानक आहे, हे समजते.

सरकारी नोकरीकडे  कल..  

देशात सध्या प्रचंड बेरोजगारी आहे. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांपेक्षा तरुणांचा कल सुरक्षेची हमी देणाऱ्या सरकारी नोकऱ्यांकडे जास्त दिसतो आहे. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पैसा तर मिळतो पण या नोकऱ्यांची शास्वती नसते. तसेच खाजगी कंपन्या म्हणेल त्या वेळेत म्हणेल तितका वेळ काम करून घेतात त्याचबरोबर खाजगी कंपन्यांमध्ये सुट्ट्यांची देखील समस्या असते त्यामुळे आजकाल तरुण तरुणींचा कल सरकारी नोकरीकडे जास्त असल्याचे पाहायला मिळते आहे.