…म्हणून हा ७ वर्षाचा चिमुकला होणार ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार !

मेलबर्न : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या आणि महत्वपूर्ण कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात आर्चे शिलर या ७ वर्षाच्या खेळाडूचा समावेश  १४ वा खेळाडू म्हणून केला आहे. हा फक्त खेळाडूच नाही तर या संघाचे नेतृत्वही करणार आहे. आर्चे शिलरने आपल्या वडीलांकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा ऑस्ट्रेलियाचा संघ आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पूर्ण केली आहे. आणि आता शिलरच्या निवडीबाबत च्या वृत्ताला ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेननंदेखील दुजोरा दिला आहे.

… म्हणून झालाऑस्ट्रेलियाचा कर्णधार
मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात  समावेश झालेल्या सात वर्षीय कर्णधार आर्चे शिलर याची कहाणी हृदयद्रावक आहे. आर्चे ज्यावेळी जन्मला त्यावेळी त्याचे हृदय खूपच अशक्त होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया जवळपास सात तास चालली होती. सहा महिन्यानंतर पुन्हा खराब झालेला हृदयाची एक झडप बदल्यासाठी त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. पण, या दोन शस्त्रक्रियांमुळे त्याची शारीरिक क्षमतेवर परिणाम झाला. त्याला जोरात धावताना त्रास होत होता. त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा त्याच्या हृदयावर तिसरी आणि मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या ओपन हार्ट शस्त्रक्रियेची डॉक्टरांनी फार  शाश्वती दिली नव्हती. शस्त्रक्रियेनंतरही त्याचा प्रत्येक दिवस हा बोनस असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

वडिलांना सांगितली इच्छा
शस्त्रक्रिया आणि शारिरीक हालचालींवर आलेल्या मर्यादेमुळे त्याची शाळाही चुकायची त्यामुळे त्याचे खूप  मित्र झाले नाहीत.  एके दिवशी आर्चे घरी आला आणि त्याने माझे फार मित्र नाहीत  आणि त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या मागे धावण्याची माझ्यात ताकद नाही. त्यामुळे मी घरी बसतो आणि पुस्तके वाचतो. आर्चेच्या वक्तव्यानंतर आर्चेच्या वडीलांनी त्याला त्याची विश विचारली होती की तुला काय बनायला आवडेल? त्यावेळी त्याने मला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्यास आवडेल असे सांगितले होते.

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्याची माहिती शिलरला यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देण्यात आली होती. त्यावेळी कांगारुंचा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. मला विराट कोहलीला बाद करायचं आहे, अशी इच्छा त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याकडे बोलून दाखवली होती. मला राष्ट्रीय संघाचा कर्णधार व्हायचं आहे, असा मानस शिलरनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाशी संवाद साधताना व्यक्त केला होता.