दुर्दैवी ! खेळताना झोक्याचा फास बसल्याने 7 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन – आई-वडील देवदर्शनासाठी गेल्यानंतर सात वर्षाच्या चिमुरडीवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे ही घटना घडली असून 7 वर्षाच्या चिमुरडीला खेळताना झोक्याचा फास बसला यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना रविवारी (दि.25) सकाळी नऊच्या सुमारास शहराच्या हद्दवाढ भागातील समर्थ विहार वसाहतीमध्ये घडली.

अभिलाषा शिवपुत्र गुरव (वय-7 रा. समर्थ विहार, एमआयडीसी) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. रविवारी सकाळी मृत मुलीचे वडील शिवपुत्र गुरव आपल्या पत्नीला घेऊन शहरातील खंडोबा मंदिरात देव दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची दोन मुलं घरीच होती. आई-वडील देवदर्शनासाठी गेले असताना, पाठिमागे मुलीवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे गुरव कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आई-वडील देवदर्शनासाठी गेल्यानंतर अभिलाषा घरात साडीने बांधलेला झोका खेळत होती. तर तिचा भाऊ आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला होता. यावेळी झोका खेळत असताना अचानक तिच्या गळ्याभोवती झोक्याचा फास बसला. मात्र घरात तिला वाचवण्यासाठी कोणीच नसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पावणे दहाच्या सुमारास तिचे आई-वडील घरी आले, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. बराचवेळ कडी वाजवून देखील दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा तोडला.

घरात प्रवेश करताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली. अभिलाषा ही फास बसलेल्या अवस्थेत झोक्याला लोंबकाळताना त्यांना दिसली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड करत आहेत.