70 वर्षीय पणजीने 4 वर्षाच्या पणतीला दिलं मुत्रपिंड, तिला नव्यानं मिळालं जीवदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या 4 वर्षाच्या पणतीला मुंबईतील एका 70 वर्षीय पणजीने मूत्रपिंडाचे दान करून तीला इतर मुलीप्रमाणे सामान्य आयुष्य जगण्याची पुन्हा संधी मिळवून दिली आहे. प्रत्यारोपणाच्या प्रकरणामध्ये रुग्ण व अवयवदाता यांच्यात चार पिढ्यांचे अंतर असण्याची अपवादात्मक गोष्ट येथे घडली आहे. प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडल्यावर अवयवदात्री आणि प्राप्तकर्ती या दोघींची प्रकृती उत्तम आहे.

आयझा तन्वीर कुरेशी या चार वर्षाच्या मुलीला ‘फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस’ (एफएसजीएस) नावाने ओळखल्या जाणारा मूत्रपिंडाचा शेवटच्या टप्प्यातील आजार होता आणि तिला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती.

Advt.

याबाबत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) मधील नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख व सल्लागार डॉ. शरद शेठ म्हणाले की, आयझा तन्वीर कुरेशी ही आमच्या रूग्णालयात आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सूज होती. मागील 6 महिन्यांपासून तिला हा त्रास होत होता. तिच्या मूत्रपिंडाचे कार्य संपूर्णपणे विस्कळीत होऊन तिला ‘मेटॅबॉलिक ॲसिडोसिस’ झाल्याचे आढळून आले. तिला तातडीने ‘हिमोडायलिसिस’वर ठेवले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तिला गरज होती. रूग्णाच्या संपूर्ण कुटुंबात,तिच्या 70 वर्षांच्या पणजीचे मूत्रपिंड हेच केवळ रुग्णाला अनुकूल ठरणारे होते. ही पणजी निरोगी होती व तिचा ‘ब्लड ग्रुप’ रूग्णाशी सुसंगत होता. तिचे वय लक्षात घेऊन तिचे संपूर्ण मूल्यांकन आणि तपासणी केली. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या पथकाने तिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. अवयवदात्री व रूग्ण यांच्यातील नाते व त्यांच्या वयातील अंतर पाहता, ही माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीतील अगदी एकमेवाद्वितीय अशी प्रत्यारोपणाची केस होती. प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडल्यावर अवयवदात्री आणि प्राप्तकर्ती या दोघींची प्रकृती उत्तम आहे. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणा-या पथकात ‘अॅंड्रॉलॉजी व रीकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. संजय पांडे, ‘युरॉलॉजी’तील सल्लागार व मूत्रपिंड प्रत्यारोपणातील सर्जन डॉ. अत्तार महंमद इस्माईल यांचा तसेच अन्य डॉक्टरांचा समावेश होता.

याबाबत रुग्णाच्या आईने सर्व डॉक्टारांचे आभार मानले आहेत. डॉ. शेठ आणि त्यांच्या टीमने माझ्या मुलीला इतर मुलांप्रमाणेच सामान्य जीवन जगण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही कायम कृतज्ञ आहोत. माझी आजी माझ्या मुलीसाठी तारणहार म्हणून आली. तिचे आभार मानायला माझ्याकडे शब्द पुरेसे नाहीत असे त्या म्हणाल्या.