धक्कादायक ! जे.जे. रूग्णालयात १९ महिन्यांत ७०४ मुलांचे मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – जानेवारी, २०१७ ते ३१ जुलै, २०१८ या कालावधीतील १९ महिन्यांत जे. जे. रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागामध्ये तब्बल ७०४ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या लहान मुलांचे मृत्यू वैद्यकीय उपचारादरम्यान तसेच शस्त्रक्रियेनंतर झाले आहेत. माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरातून ही धक्कादायक आकडे समोर आली आहे. रुग्णालयाच्या मृत्यू दाखला विभागाने दिलेल्या माहितीमध्ये हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी जे. जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभाग ज्या इमारतीमध्ये होता, ती इमारत पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आल्यानंतर हा विभाग दीड वर्षांपूर्वी त्वचा व गुप्तरोग विभाग असलेल्या इमारतीत हलवण्यात आला. या ठिकाणी एचआयव्हीच्या चाचण्यांसह, क्षयरोगाच्याही चाचण्या केल्या जातात. त्वचारोगासह गुप्तरोगाच्या चाचण्यांसाठीही येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची वर्दळ असते. या परिसराच्या शेजारी असलेल्या कम्पाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यातून जंतुसंसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या कम्पाऊंडमधील हाऊसगल्लीमध्येही सांडपाणी वाहण्यापासून कचऱ्याचे मोठे ढीग पडलेले असतात. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांपासून विविध प्रकारच्या आजार असलेल्या लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना संसर्गापासून दूर ठेवणे गरजेचे असते. अस्वच्छता व संसर्गाची लागण होऊन या मुलांना त्याचा त्रास झाला असावा, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव समीर विजय शिरवडकर यांनी नव्याने स्थलांतरित झालेल्या बालरोगविभागामधील लहान मुलांच्या वाढत्या मृत्यूचे प्रमाण किती आहे, यासाठी माहितीच्या अधिकारांतर्गत १९ महिन्यांत किती मुलांचे मृत्यू झाले, ही माहिती मागितली होती. त्यात ३७, ३८, ३९ व ४०, ४१ या पाच बालरुग्ण विभागामध्ये या कालावधीमध्ये ७०४ मुलांचा मृत्यू झाल्याचे उत्तर रुग्णालयाच्या मृत्यू दाखला विभागाने दिले आहे. या विभागामध्ये एचआयव्ही तसेच क्षयरुग्णाच्या किती चाचण्या केल्या गेल्या याचीही माहिती मागितली होती, मात्र ती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली नाही.