70 mm पडदा पुन्हा झळकणार ! ‘या’ दिवशी Multiplex सुरू करण्यास केंद्राची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या अनलॉक 5 च्या नियमावलीनुसार राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवार(दि 5 ऑक्टोबर) पासून सुरू झाले आहेत. आता मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारनं देशातील सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात एसओपी जारी करण्यात आली असून 15 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे.

माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत सांगितलं की, “कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरू होणार आहेत. केंद्र सरकारनं चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे. त्यानुसार चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच उपस्थिती लावता येणार आहे. सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स टॉकिज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे” असंही ते म्हणाले.

यापूर्वी सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह सहमती दर्शवली आहे. मात्र मंत्रालयाला असं वाटतं की, सुरुवातीला 25 टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरू करावे आणि नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी.