तब्बल ७१ पिस्तुले, दिडशे काडतुसे जप्त….

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल येलमार) – शहराचे विस्तारीकरण, औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या झाल्यानंतर गुन्हेगारीही तशीच वाढत असते. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगार दहशत माजवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर घातक हत्यारांचा वापर करतात हे दिसून येत आहे. स्वतंत्र आयुक्तालय झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तब्बल ७१ बेकायदेशीर पिस्तुल आणि १४५ काडतुसे असा एकूण १९ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील भाग वगळून १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाले. पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर.के. पद्मनाभन यांना मान मिळाला. पोलीस आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविणे सुरु केले. गुन्हे शाखेचे पथके स्थापन करुन मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. त्यानंतर गुन्हे शाखेने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगारी आणि सर्च मोहीम राबवली. खबऱ्याना जागे करुन काम सुरु केले.

पोलिसांनी गुन्हेगार दहशतीसाठी वापरात असणारे हत्यारे जप्त करण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये महत्वाचे म्हणजे बेकायदेशीर पिस्तुल जे की आज गुन्हेगारांचे स्टेटस सिम्बॉल झाले आहे, त्याकडे लक्ष वळवले. बेकायदेशीर पिस्तुल पकडण्याची कारवाईच सुरू झाले. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने १५ पिस्तुल आणि २७ काडतुसे, दोनच्या पथकाने ९ पिस्तुल आणि ३७ काडतुसे, खंडणी, दरोडा विरोधी पथकाने १६ पिस्तुल आणि २२ काडतुसे जप्त केली. पोलीस ठाण्यामध्ये ऑगस्ट महिन्यात १० पिस्तुल आणि १६ काडतुसे, सप्टेंबर महिन्यात पाच काडतुसे आणि १० काडतुसे, ऑक्टोबर महिन्यात ११ पिस्तुल आणि २३ काडतुसे, नोव्हेंबर महिन्यात तीन पिस्तुल आणि सहा काडतुसे जप्त केली आहेत.

अवघ्या चार महिन्यात शहरात एवढ्या मोठया प्रमाणात शस्त्र साठा मिळालेला आहे. यावरून शहरात पिस्तूलाचा वापर गुन्हेगारी विश्वात किती मोठ्या प्रमाणावर केला जात आहे हे स्पष्ट होत आहे.