Coronavirus : राज्यात 72 नवे रूग्ण आढळले, महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 302 वर

वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात कोरोनानं सर्वत्र हाहाकार घातला आहे. राज्यातील परिस्थिती देखील गंभीर बनली आहे. आज कोरोनाचे 72 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण मुंबई विभागात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 302 वर जावुन पोहचली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळं 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.

मुंबई विभागात 59, अहमदनगरमध्ये 3 तर पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वाशी-विरारमध्ये प्रत्येकी 2 रूग्ण अशी एकुण 72 नवे रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 302 गेली आहे. देशातील परिस्थिती देखील गंभीर बनत जात आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असला तरी काही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव आणखीनच वाढत आहेत. दरम्यान, दिल्ली येथील निजामुद्दीन येथे जमात कार्यक्रमात सामिल झालेल्यांना देखील मोठया प्रमाणावर कोरोनाची लागण झाली आहे.

जमात कार्यक्रमात सामील झालेल्यांची तपासणी सुरू असून त्यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दिल्लीच्या निजामुद्दीन येथील जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणामधील 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. याप्रकरणी दिल्ली सरकारनं मौलानाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्राची एकुणच परिस्थिती पाहता आणखी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.