भाजप सरकारचा ‘खाबूगिरी’ करणाऱ्या पोलिसांना जबरदस्त ‘झटका’, एकाच वेळी 73 जण निलंबित !

त्रिपुरा : वृत्तसंस्था – भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भाजपा सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्रिपुरा येथे भाजपा सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्या 73 पोलिसांना पोलीस दलातून निलंबित केले आहे. तर त्यातील काहींना अटक केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये 11 पोलीस अधिकारी आणि त्रिपुरा स्टेट रायफल्समधील 20 सैनिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंतच्या काळातील सर्व भ्रष्ट पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून भ्रष्ट पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांना नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायदा आणि भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी पोलीस विभाग, कायदा मोडणाऱ्या आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या पोलीस, नागरी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्रिपुरा पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या 73 भ्रष्ट पोलिसांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मच्याऱ्यांपैकी 9 जणांना निलंबनानंतर अटक करण्यात आली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री देब यांच्याकडे गृहखाते असून येणाऱ्या काळात राज्य भ्रष्टाचार मुक्त करण्याचा उद्देश असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे देब यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –