त्र्याहत्तर वर्षीय आजोबा धावले मॅरेथॉन स्पर्धेत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा येथील ७३ वर्षीय आजोबा सुरेश बाबुराव वीर यांनी सातारा येथील ‘कास हेरिटेज हिल मॅरेथॉन स्पर्धे’मध्ये सहभाग घेत दहा किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन एक तास एकोणीस मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. ७३ वर्षीय आजोबांचा उत्साह पाहून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. नीरा नजीक पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथील रहिवासी असलेले सुरेश वीर हे तीन वर्षापासून वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत.

सातारा येथे १० नोव्हेंबर रोजी झालेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत खुल्या गटातून त्यांनी भाग घेतला होता. वयाची सत्तरी ओलांडली असली तरी हे आजोबा आजही दररोज आठ किलोमीटर पायी चालतात. सातारा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी दहा किलोमीटर अंतर १ तास १९ मिनिटांंत लिलया पार केले. त्यांची मुलगी डॉक्टर नीलिमा पवार यासुद्धा त्यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यांचे जावई आयर मॅन डॉक्टर सुधीर पवार व मुलगा हृदयनाथ वी, हे त्यांना नेहमीच अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा प्रोत्साहन देत असतात.

सुरेश वीर हे पाटबंधारे खात्यात नोकरीस होते. २००५ साली ते सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळविता आला नसला, तरी मॅरेथॉन स्पर्धांमधून मात्र त्यांनी चांगलं यश संपादन केले आहे. त्यांच्या या धाडसाचं व त्यांच्या तब्येतीबद्दल लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com