प्रेम अन् लग्नासाठी वयाचं नो-लिमीट ! 73 वर्षीय निवृत्त महिला शिक्षीका शोधतेय स्वतःसाठी ‘जोडीदार’, प्रसिध्द केली ‘जाहिरात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रेमात आणि युद्धात सगळेच माफ असतं. तिथे वयाची सीमा नसते. याचं एक उदाहरण म्हणजे कर्नाटकच्या म्हैसूरमधील हा प्रकार. येथील एका ७३ वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नासाठी जाहिरात दिली. त्यावर एका ६९ वर्षीय व्यक्तीने प्रतिक्रियाही दिली आहे. कर्नाटकातील म्हैसूरमधील महिलेने दिलेली ही जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीत वयोवृद्ध महिलेने तिला एक वयस्कर जोडीदार हवा असल्याचे म्हटले आहे.

७३ वर्षीय महिलेने जाहिरात देऊन सांगितले की, ती एकाकी जीवन जगत आहे आणि तिला जोडीदाराचा शोध आहे. बंगळुरूमधील महिलावादी कार्यकर्ता वृंद अदिगे यांनी इंडिया टुडेला सांगितले की, ही एक चांगली गोष्ट आहे. यात वयाचं काही देणं-घेणं नाही. आपण सर्वांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. आपण वर्षानुवर्षे हाच विचार करत आलो आहोत की, युवावस्थेतच लग्न केलं पाहिजे.

मीडिया रिपोर्टनुसार, या जाहिरातीवर एका ६९ वर्षीय व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे. ही व्यक्ती इंजिनिअर होती आणि आता रिटायर झाली आहे. पण या व्यक्तीबाबत अधिक माहिती समोर आली नाही. या महिलेने सांगितले की, तिला पारंपारिक पद्धतीने आपल्या पतीसोबत जीवन जगायचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा घटस्फोट झाला होता.

हा अनुभव फारच भीतीदायक होता. त्यानंतर महिलेने अनेक वर्ष लग्न केलं नाही. आता तिने पुन्हा लग्न करण्याचा विचार केलाय. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. लोक या महिलेला सावधान राहण्याचाही सल्ला देत आहे. काही लोकांनी महिलेच्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींना हा निर्णय आवडला नाही.