732 रक्तदात्यांनी केले रक्तदान, संत निरंकारी मिशनद्वारे भोसरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने गुरुवार, दि.26 डिसेंबर 2019 रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, भोसरी-पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे सकाळी 8 ते 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी 732 युनिट रक्त संकलीत केले. अवकाळी पावसानंतर शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालया मध्ये नोव्हेंबर महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत होता त्यावेळी संत निरंकारी मिशनच्या 41 स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन तत्काळ रक्तदान केले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बहीण प्रीमल सिंह (प्रेस आणि पब्लिसिटी समन्वयक दिल्ली) आणि श्री.आर.आर.पाटील (सहाय्यक पोलीस आयुक्त, पिं. चिं.पोलिस आयुक्तालय) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या शिबिरादरम्यान श्री.ताराचंद करमचंदानी (झोनल प्रमुख पुणे झोन) आवर्जून उपस्थित होते.

1980 साली मिशन चे तिसरे सदगुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी सत्य, प्रेम, शांती, मानव एकता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. तेव्हा अनेकांनी त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याची इच्छा प्रगट केली अशा कठीण प्रसंगी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी सर्व अनुयायीना दया, क्षमा, शांती व अहिंसेचा मार्ग दाखवुन उपदेश केला की बलिदानाचा बदला घ्यायचा असेल तर माणसाचे रक्त नाल्यामध्ये नाही तर नाड्यामध्ये वाहिले पाहिजे. तेव्हापासून संपूर्ण विश्वामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून बाबा गुरुबचन सिंहजी आणि शहीद संतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊ लागली.

या रक्तदान शिबिरा नंतर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सर्व संतांनी आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचा आनंद घेतला. संत निरंकारी मंडळाच्या भोसरी संयोजक श्री अंगद जाधवजीं नी सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सेवादल,चॅरिटेबलच्या सर्व स्वयंसेवकांचे योगदान लाभले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/