दोनवेळा बायपास सर्जरी, व्हेंटिलेटरचीही होती गरज पण जिद्दीच्या जोरावर 74 वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण जगण्यासाठीचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार हे गरजेचे आहे. अशाच जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर 74 वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली आहे.

दादासो बडे असे त्या वृद्धाचे नाव आहे. ते बारामती तालुक्यात पैलवान म्हणून परिचयाचे आहेत. दादासो बडे यांच्यावर दोनदा बायपास सर्जरी झाली. मात्र, प्रचंड कष्टाच्या जोरावर या आजारावर मात करून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरुच ठेवला. पण काही दिवसांपूर्वी त्यांना डेंगुचा आजार झाला. त्यातून बरे झाले. मात्र, त्यानंतर बडे यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यांची कोरोना तपासणी केली. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातच त्यांना निमोनियाही झाला. त्याबाबत बोलताना दादासो बडे म्हणाले, ‘मी कोरोनाची भिती बाळगली नाही. योग्य आहार घेतला. पैलवानकीचे शरीर आहे. काय होणार नाही हा विश्वास होता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व उर्मी होती. त्यामुळे कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती पुन्हा जिंकली’.

बारामती येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कुटुंबाकडून त्यांची आरोग्यविषयक माहिती घेतली. त्यानंतर व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासेल असेही सांगितले. त्यामुळे कुटुंबीय चांगलेच घाबरले. हे सर्व घडताना पैलवान बडे मात्र जराही घाबरले नाहीत. मला काही होणार नाही? मी आजाराला घाबरत नाही? डॉक्टर तुम्ही उपचार करा असे म्हटले. त्यानंतर पैलवान बडे आठ दिवसांतच ठणठणीत बरे झाले.