Coronavirus : तिरूपती मंदिर ठरतंय ‘कोरोना’चा हॉटस्पॉट ?, पुजार्‍यांसह तब्बल 743 कर्मचारी संक्रमित, तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात प्रसिध्द आणि नावाजलेल्या मंदिरापैकी तिरूपती बालाजी मंदिर हे एक आहे. मात्र, कोरोनामुळे हे मंदिर आणखी चर्चेत आले आहे. हे तिरुपती मंदिर आता कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलंय. या मंदिरातील पुजार्‍यांसह 743 कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तिरूमला तिरूपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी दिलीय.

कोरानाने देशात थैमान घातले आहे. या कोरोनामुळे बाधित होणार्‍यांची संख्या देशात दिवसोंदिवस वाढत असताना आढळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 50 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. अशात आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी) 743 कर्मचार्‍यांना करोनाची लागण झालीय. तर, तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याने हे आता कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलंय.

यासंदर्भात‘तिरुमला तिरुपती देवस्थान’चे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी पत्रकारांना माहिती दिलीय. 11 जूननंतर देवस्थानाशी संबंधित 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी तिघांचा मृत्यू झालाय. तर 402 कर्मचार्‍यांनी करोनावर मात केलीय.

तसेच 338 जणांवर सध्या वेगवेगळ्या केंद्रांवर कोरोनाचे उपचार केले जात आहेत, असेही सिंघल यांनी सांगितले आहे. मात्र, भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरु केले आहे. हा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे, असेही यावेळी सिंघल यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊननंतर 8 जून रोजी पहिल्यांदा तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आले होते. सुरुवातीला मंदिर तीन दिवस ‘ट्रायल’ तत्वावर म्हणून उघले होते. यादरम्यान, व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय करता येईल? याची पाहणी केल्यानंतर 11 जूनपासून मंदिर भक्तांसाठी उघडले. जरी हे मंदिर उघडले असले तरी, कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी विशेष नियमावली बनविली आहे. याचे पालन करुन भक्तांना तिरुपतीचे दर्शन घेतले जात आहे.

मंदिर सुरु झाल्यानंतर काही आठवड्यातच म्हणजे 16 जून रोजी मंदिराच्या 14 पुजार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. असेही, सिंघल यांनी सांगितले आहे. 14 पुजार्‍यांना  विषाणूची लागण झाल्यानंतर इतर पुजार्‍यांची एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांना आरोग्यविषयक सूचना केल्या होत्या.

या मंदिरात एकूण 50 पुजारी असून यापैकी 14 पुजार्‍यांना मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्री व्यंकटेश्वर मंदिराचा संपूर्ण कारभार चालवला जात आहे.

लॉकडाऊनमुळे या मंदिराचे 400 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे, असेही मंदिराकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जूनच्या पाहिल्या आठवड्यामध्ये नियम शिथिल केले. त्यानंतर मंदिर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

20 मार्च 2020 पासून बंद असणारे मंदिर 8 जून 2020 रोजी पहिल्यांदा उघडण्यात आले. तेव्हा पहिल्याच दिवशी भाविकांनी सुमारे 25 लाख 70 हजार रुपये दान दिले होते. पहिले दोन दिवस केवळ तिरुमला तिरूपती देवस्थानम् मंदिरच्या (टीटीडी) कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडले होते. तर, तिसर्‍या दिवशी म्हणजे 11 जून 2020 पासून मंदिर स्थानिकांसह सर्व भक्तांसाठी उघडले होते, असेही मंदिराकडून सांगण्यात आले आहे.