75 लाखाचे खंडणीचे प्रकरण : पोलिस मित्र जयेश कासटची रवानगी पोलिस कोठडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉक्टरांकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मनोज अडसुळ यांना धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या पोलिस मित्र जयेश कासट यांना शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यास आज (रविवार) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जयेश भगवानदास कासट (42, रा. फ्लॅट नं. सी-4, संकुल सोसायटी, दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल जवळ, एरंडवणा, पुणे / नारायण पेठ) पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त आहे. पोलिसांबरोबर असलेल्या ओळखीचा गैरफायदा त्यांच्या नावाने धमकावुन खंडणी उकळल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मनोज अडसुळ यांचा भाऊ डॉ. हेमंत तुकारामअडसुळ (वय ५५, रा. चिंतामणीनगर, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना जयेश कासटने २ जानेवारी रोजी दुपारी फोन करुन नारायण पेठेतील निरंजन मेडिकल या ठिकाणी बोलावले़ तेथे जर आला नाही तर तुझा भाऊ मनोज प्रचंड अडचणीत येईल. सायंकाळी ते दुकानात गेल्यावर त्याने मी पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यास या ट्रस्टचा मेंबर आहे. व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर ६ जानेवारीला त्याने पुन्हा धमकी दिली. तेव्हा आम्ही ५ लाख रुपये रोख दिले़ तरीही त्याने डॉ. रासने यांनी दिलेल्या ७० लाख रुपयांची मागणी करुन त्रास देण्यास सुरुवात केली.

पोलीस मित्र म्हणून वावरणारे जयेश कासट आपल्याकडे खंडणी मागत असल्याची तक्रार मनोज अडसुळ यांनी पोलीस आयुक्तांकडे ६ फेबु्रवारी रोजी केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे मोबाईलवरील संभाषणही आयुक्तांना ऐकविले होते. पोलीस आयुक्तांनी याची चौकशी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे दिली. अडसुळ यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी जयेश कासट यांना गुन्हे शाखेत बोलविण्यात आले असताना डॉ. दीपक रासने हे तेथे आले व त्यांनी मनोज अडसुळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यावरुन मनोज अडसुळ यांच्यावर ७५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

तेव्हापासून मनोज अडसुळ फरारी आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर शनिवारी डॉ. हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन जयेश कासट यांना अटक केली. जयेश कासटला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.