भंडारा : आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने 75 जणांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने तब्बल 75 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे आज (मंगळवार) घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेत शिबीर लावले आहे. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावने (वय-11 रा. भेंडाळा) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजार होता. या आठवडीबाजारात अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. सोमवार दुपारपासून अनेकांना उटली आणि मळमळचा त्रास होऊ लागला. याबाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी तब्बल 75 जणांना त्रास होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली.

आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून भेंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात शिबीर लावून उपचार सुरु केले
आहेत. आतापर्यंत 75 जणांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी नऊच्या सुमारास ज्ञानेश्वरी सतीबावने या बालिकेचा मृत्यू झाला. ती इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी भेंडाळा येथे धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी पाणी पुरी स्टॉलचे नमुने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.