Lockdown : ‘कोरोना’च्या विळख्याने अपेक्षित घरांच्या नोंदणीत 78 % घट !

 पोलीसनामा ऑनलाइन –  मागील दोन वर्षे मंदीच्या गर्तेत अडकलेला गृहबांधणी उद्योग कसाबसा सावरत असताना आता ‘कोरोना’चे जागतिक संकट उद्भवले आहे. त्यामुळे या उद्योगाचा आर्थिक कणाच मोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा जानेवारी-फेब्रुवारीत ग्राहकांनी दाखविलेला रस पाहून विकासक उत्साहित झाले होते; पण त्यांनी मार्चपर्यंत अपेक्षित धरलेल्या नोंदणीत आता 78 टक्के घट झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे देशभरात टाळेबंदी जाहीर होण्याआधीच्या काही महिन्यांत ग्राहकांनी केलेली नोंदणी रद्द होण्याचे प्रमाण तब्बल 200 टक्क्यांवर पोहोचल्याचे ‘एमसीएचआय-क्रेडाई’च्या अहवालात म्हटले आहे.

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी विकासकांना काही महिने लागतील, अशी भीती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज-कॉन्फर्डेशन अ‍ॅण्ड रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एमसीएचआय-क्रेडाई)ने व्यक्त केली आहे. कोरोनाचा स्थावर संपत्तीवर परिणाम’ असे या अहवालाचे नाव आहे. संघटनेच्या शंभर बडया विकासकांकडील तपशील तपासून हा अहवाल तयार केला आहे. जानेवारी-फेब्रुवारीत ग्राहक मोठया संख्येने घरनोंदणीसाठी आकर्षित झाले होते. मात्र, त्यानंतर घरनोंदणीत घट नोंदविण्यात आली. कोरोनामुळे जगभरातील आर्थिंक उद्योग थंडावला आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामध्ये विविध क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.